संतभूमीत वणीच्या लेखकाचा गौरव; गोपाळपुरात सुनील इंदुवामन ठाकरे यांचा सत्कार

वणी :

संत साहित्यावर सातत्याने लेखन करणारे वणी येथील लेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांच्या कार्याची संतभूमीत दखल घेण्यात आली. पंढरपूर जवळील गोपाळपुर येथील संत काशीबा गुरव महाराज समाधी मंदिरात त्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील मंदिर ‘जनाबाईंचा संसार’ म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी संत काशीबा गुरव महाराजांची समाधी असून, ठाकरे यांनी त्या स्थळाला भेट देत संत काशीबा महाराजांच्या जीवनकार्याचा अभ्यास सुरू केला आहे.
संत काशीबा महाराजांनी समकालीन संत सावता महाराजांचे अभंग लिहून जतन केल्याचे मानले जाते. त्यांच्या कार्यावर संशोधन करण्यासाठी सुनील इंदुवामन ठाकरे काही दिवस पंढरपुरात वास्तव्यास होते. यावेळी संस्थानचे अध्यक्ष दिलीपभाऊ भोसले तसेच काशीबा महाराज मठाचे ह.भ.प. माउली महाराज गुरव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुनील इंदुवामन ठाकरे यांनी यापूर्वीही संत काशीबा महाराजांवर ‘रिंगण’ विशेषांकात लेखन केले आहे. समाधीस्थळासंदर्भातील नव्या माहितीमुळे संशोधनाला नवे आयाम मिळाले. पुढील संशोधनाची जबाबदारी ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी ठाकरे यांच्यावर सोपविली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात ‘रिंगण’ विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. संतश्रेष्ठ नामदेवराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या समकालीन संतांवर आधारित ‘रिंगण’चे आजवर १३ विशेषांक प्रकाशित झाले आहेत. यामध्ये संत कुर्मदास, जगमित्र नागा, जोगा परमानंद, कान्हो पाठक, काशीबा गुरव आदी संतांच्या कार्याचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post