वणी (वार्ता) :
वणी शहरातील हिंदू स्मशानभूमीवरील वाढत्या अतिक्रमणाच्या प्रश्नाने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले असून, सदर जागा अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. यासंदर्भात दि. ८ मे २०२६ रोजी मुख्याधिकारी, नगर परिषद वणी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांना तब्बल ४७० नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, वणी येथील शीट क्रमांक ११ मधील प्लॉट क्रमांक २, क्षेत्रफळ ४०,४७१.७ चौ. मीटर (सुमारे १० एकरपेक्षा अधिक) जागा शासनाने दि. १० जुलै १९२९ रोजी सी.पी. अँड बेरार म्युनिसिपालिटी अॅक्ट १९२२ च्या कलम ३(१) ३-क अंतर्गत कोणतेही प्रीमियम अथवा भाडे न आकारता हिंदू स्मशानभूमीसाठी नगर परिषद वणीच्या ताब्यात दिली होती.
ही जागा सर्व धर्मीयांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरली जात असल्याने तिचे संरक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंदाजे ४ ते ५ एकर जागेवर एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह अनेक नागरिकांनी अतिक्रमण करून घरबांधणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सध्या वणी शहरात मुस्लिम, ख्रिश्चन आणि हिंदू अशा तीन स्मशानभूमी अस्तित्वात आहेत. मुस्लिम व ख्रिश्चन स्मशानभूमींना संरक्षण भिंती असल्याने त्या सुरक्षित आहेत. मात्र, हिंदू स्मशानभूमी खुली असल्यामुळे तेथे अतिक्रमणाचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगर परिषदेकडून श्री मोक्षधाम सेवा समितीकडे स्मशानभूमीच्या विकास व देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी अतिक्रमणामुळे विकासकामात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
स्मशानभूमीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करावी व सर्व अतिक्रमण हटवून जागा अतिक्रमणमुक्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अंत्यसंस्कारासाठी जागेची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.