वणी :
तालुक्यातील वडगाव (धं) येथील प्लॉट विक्री प्रकरणात महसूल विभागातील धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला असून, बनावट फेरफार, खोटे सातबारा आणि बनावट व्यवहाराच्या आधारे नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी, दलाल आणि कथित जमीनमालक अशा चौघांविरोधात वणी पोलिसांत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सूरज रमेश चाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सतीश केराम याने मौजा वडगाव (धं) येथील प्लॉट विक्रीस असल्याचे सांगून त्यांची व संजय तरवटकर यांची भेट शैलेश वाकडे यांच्यासोबत घालून दिली. संबंधित प्लॉट शैलेश वाकडे यांच्या नावावर असल्याचे सांगत सातबारा, फेरफार आणि नकाशा दाखविण्यात आला. तसेच तलाठी रविंद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांनीही कागदपत्रे खरी असल्याची खात्री दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर 19 जुलै 2024 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, वणी येथे खरेदीखत नोंदवून फिर्यादींकडून एकूण 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे घेण्यात आली. मात्र काही दिवसांनी प्लॉटची मोजणी करताना सदर प्लॉट प्रत्यक्षात दीपक भट्टाचार्य यांच्या नावावर असल्याचे समोर आले. यानंतर संबंधितांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, फेरफार क्रमांक 1539 हा पूर्णपणे बोगस असून दाखविण्यात आलेला 2015 मधील व्यवहार कधीच झाला नसल्याचे महसूल विभागातील चौकशीत स्पष्ट झाले. गैरप्रकार उघडकीस येण्याची भीती निर्माण झाल्यानंतर तलाठ्यानेच फेरफार रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल केल्याची बाबही समोर आली आहे.
उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणी होऊन संबंधित फेरफार आणि नोंदी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीदेखील फिर्यादींची आर्थिक फसवणूक झाल्याने अखेर वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणामुळे महसूल विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बनावट फेरफारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जमीन घोटाळ्यांचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संबंधित प्रकरणात सुरुवातीला गुन्हा नोंद होत नसल्याने वणी शहरातील पत्रकारांनी थेट पोलीस ठाण्यात चटई टाकून ठिय्या आंदोलन सुरू केले. “हातर रे ती चटई...!” अशी संतप्त प्रतिक्रिया देत पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर गुन्हा नोंद झाल्यानंतरच पत्रकारांनी ठिय्या मागे घेतला.