20 मे रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंद; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटनांचा एल्गार

वणी /

दि. 20 मे गुरुवारी भारतभर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात ऑल इंडिया औषधी संघटनेच्या वतीने एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननेही पाठिंबा दर्शविला असून, नागरिकांनी आवश्यक औषधांची खरेदी 19 मेपूर्वी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन औषध विक्री ही रुग्णांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळण्यासारखी बाब ठरत आहे. ऑनलाईन औषध विकणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती औषधांची गुणवत्ता, मुदतबाह्य औषधे तसेच औषधांच्या दुष्परिणामांबाबत कोणतीही जबाबदारी घेत नसल्याचे सांगण्यात आले. अनेक नागरिकांना ऑनलाईन खरेदी केलेल्या औषधांमुळे दुष्परिणामांना सामोरे जावे लागल्याच्या घटना समोर आल्याचा दावा संघटनेने केला आहे.
तसेच नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या Narcotic औषधांची ऑनलाईन सहज उपलब्धता ही गंभीर सामाजिक समस्या बनत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन खरे की खोटे याची शहानिशा न करता औषधे उपलब्ध होत असल्याने तरुण वर्गावर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसायावर परिणाम होत असून, भविष्यात बेरोजगारीची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या सर्व बाबी लक्षात घेता ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास भविष्यात बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशाराही औषध विक्रेता संघटनांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post