जुगार अड्ड्यांवर वणी पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ५३ गुन्हे दाखल, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!, नागरिकांना आवाहन – बेकायदेशीर प्रकारांची माहिती द्या, सहकार्य करा

वणी : प्रतिनिधी

शहरातील अवैध जुगार व्यवसायाविरोधात पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत व्यापक मोहीम राबवली असून, १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी धाडी टाकत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत एकूण ५३ जुगार प्रकरणे दाखल करण्यात आली असून सुमारे ₹३,५१,६५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिंधी कॉलनी, एकता नगर, भाजी मंडी, दीपक चौपाटी, लालगुडा परिसर अशा विविध भागांत लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी अचानक छापे टाकून अवैध धंद्यांना मोठा धक्का दिला आहे.
पोलीस विभागाकडून सातत्याने माहिती संकलन करून विशेष पथकांच्या माध्यमातून या कारवाया करण्यात येत आहेत. या मोहिमेमुळे शहरातील जुगार व्यवसायावर प्रभावी आळा बसत असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांबाबत तत्काळ माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस स्टेशन वणी तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post