वणी विधानसभेसाठी शिवसेना (शिंदे)ची १२ सदस्यीय कोअर कमिटी जाहीर

वणी :

वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे) पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने १२ सदस्यीय कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पक्षाचे स्थानिक स्तरावरील महत्त्वाचे निर्णय, कार्यक्रमांचे नियोजन तसेच संघटनात्मक धोरणे यापुढे या कोअर कमिटीच्या माध्यमातूनच निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा संघटक *विजय चोरडिया* यांनी दिली. हि कोअर कमिटी जिल्ह्याचे नेते पालकमंत्री संजय राठोड यांना विस्वासात घेऊनच निर्णय घेणार आहे असेही त्यांनी सांगितले.
या कोअर कमिटीत जिल्हा संघटक विजय चोरडिया, माजी उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास, सहसंपर्क प्रमुख (वणी विधानसभा) विनोदभाऊ मोहितकर, सुधाकर गोरे, आशिष खुळसंगे, विधानसभा संघटक किशोर नांदेकर, उपजिल्हा प्रमुख उमेश वैरागडे, विधानसभा समन्वयक चंद्रकांत घुगुल, गजानन किन्हेकर, राजू देवडे, विजय मेश्राम आणि राहुल मुंजेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
विजय चोरडिया यांनी सांगितले की, पक्षाची शिस्त, समन्वय आणि संघटनात्मक कार्यपद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी ही कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यापुढे या कमिटीतील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नावाने कोणतेही कार्यक्रम किंवा निर्णय घेता येणार नाहीत.
या नव्या निर्णयामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (शिंदे) पक्षाची संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post