वणी :
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) – २०२६ मध्ये वणी येथील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत नायरा चंद्रकांत झाडे, जोयब जाकीर शेख, कैवल्य अमित वल्लपकर, राघव विजयशंकर सिंह आणि रिध्वी नितीन पाटकुरवार यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री. अजय पिंपळशेंडे (सिंगापूर), माजी सभापती पंचायत समिती वणी तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय पिंपळशेंडे, प्राचार्या सौ. अश्विनी सचिन ढोले, उपप्राचार्या सौ. पूजा जोबनपुत्रा, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे कुशल मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या यशामुळे ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, भविष्यातही विद्यार्थी अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम ठेवून शाळेचे, पालकांचे आणि वणी शहराचे नाव राज्यभर उज्ज्वल करतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.