वणी :
मारेगाव तालुक्यातील मौजा उमरघाट येथील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय खाडे यांनी मंगळवारी (दि. २८ जुलै) वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) वणी नॉर्थ एरियाचे क्षेत्रीय महाप्रबंधक यांची भालर येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात उमरघाट येथील उर्वरित सर्व शेतीजमिनींचा बोर्डा भूमिगत (UG) अथवा घोणसा ओपनकास्ट (OC) खाण प्रकल्पामध्ये समावेश करून त्यांचे एकत्रित अधिग्रहण करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच सर्व बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला, पुनर्वसन आणि कायद्यानुसार मिळणारे सर्व लाभ तातडीने देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी संजय खाडे यांनी अनेक वर्षांपासून अधिग्रहणाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आर्थिक व मानसिक अडचणीत असल्याचे सांगत, संपूर्ण गावाचे संयुक्त सर्वेक्षण करून लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक करून त्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी WCL प्रशासनासमोर ठामपणे मांडली.
यावेळी डॉ. शंकर वऱ्हाटे, अशोक धोबे, गजानन सरवर, सुभाष जूनधरे, शैलेश खामनकर, गजानन उपरे, संस्कार मोहुर्ले, दिनेश जयस्वाल, संजू आत्राम, गौरव उरकुडे, संदीप चिडे, शंकर बटशेट्टीवार, नितीन गंधेवार, आकाश गज्जलवार, रक्षक नगराळे, उज्वल गंधेवार, संजय गंधेवार, संतोष मोहुर्ले, सतीश बोढे, गजानन झाडे, भीमराव वाधाडे, मेघश्याम उपरे, सौ. स्वप्नाली उपरे तसेच अन्य शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.