वणी / स्टिंग ऑपरेशन न्यूज :
सनातन संस्थेच्या वतीने यंदाचा 'गुरुपौर्णिमा महोत्सव' देशभरातील ८१ ठिकाणी, तर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ आणि वणी येथे बुधवार, २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. वणी येथील एस. बी. हॉल येथे सायंकाळी ५.३० वाजता गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार असून, या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राष्ट्र-धर्म रक्षणासाठी समाजाला प्रेरणा देणे आणि भारताच्या अद्वितीय गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे सनातन संस्थेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.
संस्थेच्या माहितीनुसार, सध्याच्या जागतिक व राष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक आणि राष्ट्रीय आव्हानांविषयी जनजागृती करून अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न या महोत्सवातून केला जाणार आहे. यंदाचा गुरुपौर्णिमा महोत्सव 'रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव' या संकल्पनेवर आधारित आहे.
महोत्सवात श्री व्यासपूजन, प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्यावर आधारित लघुपट, धर्मरक्षक व हिंदुनिष्ठ व्यक्तींचा सत्कार, राष्ट्रभक्त व धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्य स्थापनेचा संकल्प व नामजप, तसेच 'रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा' या विषयावरील विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.