वणी : प्रतिनिधी
चिखलगाव (महादेव नगरी) येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धाची तब्बल 7 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी सुरेंद्र दादाजी बोबडे (वय 62, रा. चिखलगाव, ता. वणी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुरेंद्र आस्कर (रा. घोन्सा, सध्या मेघदूत कॉलनी, चिखलगाव) व सचिन सुरेश गारघाटे (रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर) यांनी त्यांच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.
दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी सुमारे सकाळी 11 वाजताच्या सुमारास चिखलगाव येथे ही घटना घडली. आरोपींनी विश्वास संपादन करून फिर्यादींकडून एकूण 7,50,000 रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता पैसेही परत न दिल्याने अखेर फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी दि. 08 एप्रिल 2026 रोजी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निलकमल भोसले (HC/1020) करीत असून आरोपींचा शोध सुरू आहे.
⚠️ विशेष :
नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांनी अशा प्रलोभनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.