वणी :
वणी तालुक्यातील उकणी-बेलसनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संघर्ष शनिवारी पुन्हा उफाळून आला. शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी उकणी वासीयांनी बेलोरा गावाजवळील चेकपोस्टवर चक्काजाम आंदोलन करत कोळसा वाहतूक रोखून धरली. त्यामुळे वणी–चंद्रपूर मार्गे घुग्घुसकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अखेर वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोलि) अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
उकणी खंड-१ परिसरातील सुमारे ८५ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. मात्र उर्वरित १७० शेतकऱ्यांची जवळपास ६०० एकर जमीन अद्याप संपादित झालेली नाही. वेकोलिकडून होत असलेल्या विलंबामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी चक्काजाम आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान या मार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वेकोलि निलजई उपक्षेत्राचे प्रबंधक एस. के. सुतार तसेच क्षेत्रीय योजना अधिकारी एस. पी. सिंग यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. चर्चेनंतर शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली.
अन्यथा संघर्ष तीव्र करू – संजय खाडे
“आजचे आंदोलन हे शेतकऱ्यांच्या संयमाचा झालेला उद्रेक आहे. वर्षानुवर्षे आश्वासने देऊन प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली जात आहे. आम्हाला संघर्ष नको आहे; पण न्याय नाकारला तर संघर्ष अपरिहार्य ठरेल. जमीन संपादन, पुनर्वसन, आश्रितांना नोकऱ्या आणि प्रलंबित नुकसानभरपाई हे प्रश्न तातडीने मार्गी लावले गेले पाहिजेत. वेकोलिने दिलेले लेखी आश्वासन जर प्रत्यक्षात उतरले नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक स्वरूपाचे असेल,” असा इशारा संजय खाडे यांनी दिला.
या आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश धपकस, उपाध्यक्ष अमोल पुरडकर, उपाध्यक्ष पराग तुराणकर यांच्यासह शामसुंदर जुनारकर, सचिन लोडे, घनश्याम खाडे, चंद्रकांत जीवतोडे, पद्माकर झाडे, महेश पाटील, विकास लालसरे, संतोष धांडे, किसन पारशिवे, ॲड. सूरज महातळे, संजय बांदुरकर यांच्यासह उकणी व बेलसनी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.