वणी शहर हादरले;डोक्यावर प्रहार करून मित्रानेच केला मित्राचा खून..!

वणी :

शहरातील बाकडे पेट्रोल पंपासमोर एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने बुधवारी रात्री वणी शहर हादरले. ही धक्कादायक घटना रात्री सुमारे ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन मित्रांमधील किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. संबंधित तरुणाच्या डोक्यावर प्रहार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यानंतर मृतदेह झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दामले फैल येथील मल्लेश नावाच्या तरुणाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्याचा मित्र भुऱ्या याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
खून नेमका कोणत्या कारणावरून झाला, याचा तपास सुरू असून पोलिस तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post