वणी :
आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलीस ठाणे यांच्या प्रांगणात दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी दळवी साहेब उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार गोपाल उंबरकर यांची उपस्थिती लाभली.
यावेळी ठाणेदार उंबरकर यांनी आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, ईद अल-फित्र तसेच होळी व रंगपंचमी या सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजबांधवांनी सण शांततेत व उत्साहात साजरे करावेत, असे आवाहन केले. सणोत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी सक्रिय सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत प्रा. पुरुषोत्तम पाटील, मंगल तेलंग, मंगला झिलपे, शालिनीताई रासेकर, वंदना आवारी, झाबक, रहीमभाई, अजिंक्य शेंडे, अनुप खत्री, न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष दिपक छाजेड आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शहरातील वाहतुकीच्या समस्येवर विशेष चर्चा करण्यात आली. वणी शहरातील शाळकरी विद्यार्थी एमडी, गुटखा यांसारख्या मादक पदार्थांच्या व्यसनाधीन होत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच काही युवक सुनसान ठिकाणी जाऊन व्यसन करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी केले, तर सहायक पोलीस निरीक्षक शेखर वांढरे यांनी आभार प्रदर्शन केले. या बैठकीस शांतता समितीचे सदस्य, व्यापारी, पत्रकार तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.