देशव्यापी संपाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा🔺 मोर्चात शेतकरी, शेतमजूर, आशा स्वयंसेविका यांचा सहभाग

यवतमाळ/ स्टिंग ऑपरेशन न्यूज

केंद्र सरकारने कामगारांनी प्रदीर्घ संघर्षातून मिळवलेले २९ कामगार कायदे रद्द करून ४ नवीन श्रम संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ देशातील विविध कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला. या संपाला पाठिंबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा व सी आय टी यू (आशा संघटना लाल बावटा) यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.
कामगारविरोधी चार नवीन श्रम संहिता रद्द कराव्यात, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, शेतमालाला हमीभावाचा कायदा करावा, वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आदिवासी व गैरआदिवासी वनजमीन अतिक्रमण धारकांचे दावे दोन पुराव्यांच्या आधारे मंजूर करावेत, आशा स्वयंसेविकांना कर्मचारी दर्जा देऊन मानधनाऐवजी वेतन द्यावे, दरमहा ५ तारखेला मानधन अदा करावे, वेतन पावती द्यावी तसेच सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० ऐवजी ६५ वर्षे करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले.
मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयापासून जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर तेथे सभा घेण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ॲड. दिलीप परचाके, ॲड. डी. बी. नाईक, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम तसेच सीआयटीयू आशा संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे यांनी केले.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. अनिता खुनकर, कवडू चांदेकर, सुरेखा बिरकुलवार, किसन मोहूरले, संजय वालकोंडे, गजानन ताकसांडे, वंदना गेडाम, मनीष इसालकर, रमेश मिरासे, सदाशिव आत्राम, श्रीकांत तांबेकर, बाबुलाल टेकाम, संदीप सुरपाम, भीमराव आत्राम, भाऊराव टेकाम, हरीभाऊ चिकरम, सुभाष नांदेकर, अर्जुन शेडमाके, संजय कोडापे, अमोल चटप, मंगेश सरोदे, शांताबाई उरकुडे, संभा टोंगे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post