मानकी येथे महिला ग्रामसभा यशस्वी; महिलांचा निर्धार – गावातील अवैध दारू बंद करणार!

वणी / प्रतिनिधी :

वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा मानकी येथे अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील युवक व पुरुष मंडळी व्यसनाधीन होत असून, त्यातून घराघरांत वाद, तंटे व मारहाणीचे प्रकार वाढत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
सभेमध्ये गावातील सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच संबंधित प्रशासन व पोलीस यंत्रणांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही महिलांनी केली. गावातील सामाजिक वातावरण बिघडू नये आणि कुटुंबे सुरक्षित राहावीत यासाठी महिलांनी एकजूट दाखवत ठाम भूमिका घेतली.
यावेळी सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय काकडे, पोलिस पाटील सौ. मिनाक्षी सुजीत मिलमिले, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे तसेच सुमारे १२० महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या. ग्रामसभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी आर.एच. सोळंके यांनी पाहिले.
महिलांच्या या निर्धारामुळे मानकी गावात लवकरच अवैध दारूविक्रीवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post