वेदा बार मॅनेजरला शिवीगाळ करून खंडणीची मागणी; प्रहार च्या पदाधिकाऱ्या विरुद्ध वणी पोलीसात गुन्हा दाखल

वणी /

वणी - वरोरा मार्गावरील पाटाळा पुलाजवळील ‘वेदा बार अँड रेस्टॉरंट’ येथे बार मॅनेजरला खंडणी मागून शिवीगाळ केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने स्वतःला एका पक्षाचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगून बार मालकाकडून दरमहा २५,०००/- हजार रुपयेची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वेदा बारचे मॅनेजर श्री. शंकर चंद्रीका साह (वय ३३, रा. कुचना, ता. वणी) हे काउंटरवर कार्यरत असताना, मोबीन शेख (वय अंदाजे २५, रा. एकता नगर, वणी) नावाचा इसम बारमध्ये आला. दारू पिल्यानंतर मॅनेजरने मोबीनकडे बिलाची मागणी केली असता, त्याने बिल देण्यास नकार दिला.

मोबीन शेख याने मॅनेजरला धमकावत सांगितले की, "मी प्रहार पक्षाचा वणी तालुका अध्यक्ष आहे. तुमचा बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहतो. त्याकरिता मला २५ हजार रुपये महिना द्यायला सांग." असे म्हणत त्याने मॅनेजरला शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या वेळी बारमधील विलास भोयर आणि श्रीकांत पाथरटकर हे देखील उपस्थित होते असे लेखी फिर्यादीत नमूद आहे.

घटनेनंतर मॅनेजर शंकर साह यांनी त्यांचे मालक श्री. अभिजीत सातोकर यांना फोनद्वारे संपूर्ण माहिती दिली.

श्री. शंकर साह यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये लेखी फिर्याद दाखल केली. त्यांच्या जबानी रिपोर्टनुसार, आरोपी मोबीन शेख याच्याविरुद्ध १९ जानेवारी ला रात्री ०२:११ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०८(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post