मारेगाव येथे रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू, "रस्ता द्या, नाहीतर जीव घ्या" आंदोलक भूमिकेवर ठाम..!, वंचित उपोषणकर्ते शेतकऱ्यांच्या पाठीशी - राजु निमसटकर

स्टिंग ऑपरेशन न्यूज/

अस्तित्वात असलेला शेतमाल वाहतुकीचा रस्ता, मोकळा करून देण्यास मारेगांव तहसील प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने मारेगांव तालुक्यातील देवाळा येथील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२५ पासून मारेगांव तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याअभावी तब्बल १४ पेक्षा अधिक कुटुंबांच्या शेतामधील सोयाबीन आणि कापूस अजूनही शेतातचं पडून असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आल्याची गंभीर व्यथा उपोषणकर्ते शेतकरी बापूजी अमृत देवाळकर व संजय अमृत देवाळकर यांच्यासह शेतकऱ्यांनी मांडली आहे. 
हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्वात छेडण्यात आले असून न्याय मिळेपर्यंत संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूज ला सांगितले. 
कायद्याचे पाठबळ असूनही प्रशासनाच्या निष्क्रियेमुळे मारेगांव तालुक्यातील देवाळा येथील शेतकरी बापूजी अमृत देवाळकर व संजय अमृत देवाळकर यांच्यासह जवळपास १४ कुटुंबे अनेक दिवसांपासून आपल्या शेतात जाण्यासाठीच्या रस्त्याच्या अडथळ्यामुळे त्रस्त आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १४३ आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ चे कलम ५ नुसार हा कायद्याचा आधार असतानाही त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. याच कायदेशीर हक्काचा वापर करत, उपोषणकर्त्यांनी १५/१०/२०२५ रोजी मारेगाव तहसीलदारांकडे मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ च्या कलम ५ नुसार तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल केल्यानंतरही वारंवार संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. नायब तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन नकाशाच्या आधारे रस्त्याची पाहणी केली होती. त्यावेळी गैरअर्जदारांनीच रस्ता अडवून धरल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
इतके स्पष्ट पुरावे आणि कायद्याचे पाठबळ असतानाही, तहसील प्रशासनाने गैरअर्जदारांची पाठराखण करत शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा केला नाही, असा गंभीर आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे.

रस्त्याच्या अडथळ्यामुळे शेतमाल घरी आणता येत नाहीये, परिणामी तो शेतातच खराब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून, नाइलाजाने टोकाचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याची खंत आंदोलक नेतृत्वाने व्यक्त केली आहे. 

संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी, खंबीरपणे उभी राहिली असून, आंदोलनाचे नेतृत्व देखील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांचे सह वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर करीत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा कायदेशीर हक्क असलेला रस्ता मोकळा करून मिळत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलक नेतृत्वाने घेतली आहे.
उपोषणादरम्यान काही विपरीत घडल्यास, त्याला सर्वस्वी मारेगांव प्रशासन जबाबदार असेल, असा गंभीर इशारा वंचितचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांचे सह आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post