वणी :
वणी नगर परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज शनिवारी पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा केली.
नगर परिषदेतील 14 प्रभाग व एक नगराध्यक्ष पदांसाठी एकूण 29 नगरसेवक निवडले जाणार असून, या निवडणुका येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहेत. मागील काही दिवसांपासून काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गट यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरु होती.
परंतु वारंवार बैठका घेऊन सुद्धा कोणताही तोडगा निघू शकला नाही. काँग्रेस व उबाठा गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गौण समजून निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वतंत्र निवडणुकीचा निर्णय घेत, आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा केली.
या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा उपाध्यक्ष समीर बेग, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण, तालुका अध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, रामकृष्ण वैद्रद्य, तालुका सचिव प्रदीप खोब्रागडे, महेंद्र चांदोरे, नरेंद्र लोणारे, खुशाल बासमवार आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मतदारांना सचोटीने विकास करणाऱ्या उमेदवारांना संधी द्यावी, व इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.