वणी /
वणीतील नामांकित सहकारी संस्था वसंत जिनिंग अँड
प्रेसिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव १३ विरुद्ध १ मतांनी पारित करण्यात आला आहे.
आज बुधवारी दिनांक १२ नोव्हेंबर ला याबाबत वसंत जिनिंग येथे विशेष सभा पार पडली. या सभेत अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला.
एकाधिकार, कामात अपारदर्शकता इत्यादी आरोप करीत गेल्या काही काळापासून आशिष खुलसंगे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची टांगती तलवार होती. दिड वर्षांआधी लोकसभा निवडणूक असल्याने वरीष्ठांनी यात हस्तक्षेप केला. त्यानंतर हा वाद थांबवण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा अविश्वास प्रस्तावासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या.
३ नोव्हेंबर रोजी वसंत जिनिंगच्या १३ संचालकांनी आशिष खुलसंगे यांच्या विरोधात जात उपनिबंधकांना अविश्वासाबाबत पत्र दिले होते. त्यावर जिल्हा उपनिबंधक यांनी महाराष्ट्र सहाकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ (१) (३) अन्वये आदेश जारी केला होता. त्यानुसार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दु.१ वाजता वसंत जिनिंगच्या सभागृहात विशेष सभा भरवण्यात आली होती. यात अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. यावर १३ विरुद्ध १ मतांनी हा प्रस्ताव पारीत झाला.