वणी :
वेकोलि उकणी- वणी नॉर्थ क्षेत्रातील समस्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार आणि बैठका होऊनही काहीही तोडगा निघत नसल्याने अखेर ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक मत्ते यांनी येत्या ९ ऑक्टोबरला सकाळी सात वाजता जुनाड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सरपंच मत्ते यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वेकोलिच्या खाणीमुळे परिसरात धूळ, प्रदूषण, पिकांचे नुकसान, आरोग्यावरील दुष्परिणाम, रस्त्यालगत काटेरी झुडपे आणि जंगली प्राण्यांचा धोका या समस्या निर्माण झाल्या आहेत. जुनाड फाटा ते उकणी रस्ता परावर्तित करण्यात आला असला तरी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र समांतर रस्ता बांधण्यात आलेला नाही. तसेच डम्पिंगमुळे गावालगत धोका निर्माण झाला असून, उर्वरित जमीन संपादन आणि रस्त्यालगत विद्युत दिवे बसविण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे.
या सर्व मागण्यांबाबत सरपंच दिपक मत्ते,माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर, यांनी वेळोवेळी वेकोलि प्रशासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात एक ऑक्टोबर रोजी बैठक झाली. मात्र वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, वेकोलि प्रशासनाने तत्काळ समस्या सोडवाव्यात, अन्यथा आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस वेकोलि प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर पिंपळगाव चे सरपंच दिपक मत्ते, उकणी चे सरपंच सचिन खाडे, ब्राम्हणी चे उपसरपंच बाळू खामनकर, पुजा बोढाले, अतुल बोंडे, महेश देठे, प्रदिप जेऊरकर यांच्या स्वाक्षरी आहे.