कायर मार्गावर राष्ट्रवादीचे 'जोडा मारा' आंदोलन., !पेटुर येथे उखडलेल्या रस्त्यावर जनतेचा उद्रेक, आश्वासनानंतर आंदोलन मागे

वणी :- 

तालुक्यातील कायर मार्ग क्रमांक ३१९ वरील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात अखेर जनतेचा संताप उसळला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज गुरुवारी पेटुरजवळील १८ नंबर पुलाजवळ “जोडा मारा आंदोलन” करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

नागरिकांचा थेट सवाल — “रस्त्यावरचा पैसा गेला कुठे?”
उखडलेले बिटुमिन, खोल खड्डे आणि सततच्या अपघातांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बांधकामाचा DLP कालावधी अद्याप शिल्लक असतानाही दुरुस्ती सुरू न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी थेट जनतेचा प्रश्न उचलला — “अधिकाऱ्यांनी रस्ता बनवला की लुटला?”

“रस्ते खाणारे राक्षस” म्हणत अधिकाऱ्यांच्या प्रतिमांना जोडे वर्षाव

संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंत्यांच्या प्रतिमा फलकावर लावून त्यांना “रस्ते खाणारे राक्षस” ठरवले! त्यानंतर जोडे आणि चप्पलांचा वर्षाव करत प्रतीकात्मक निषेध व्यक्त झाला. या दृश्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
घोषणाबाजीने पेटुर परिसर दणाणला

दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बॅनर व फलक जप्त केले. मात्र आंदोलनकर्त्यांनी “रस्ते दुरुस्त करा!”, “जनतेचा पैसा खाल्ला का?”, “अधिकाऱ्यांच्या चौकशीशिवाय थांबणार नाही!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

आंदोलनाचे नेतृत्व दिलीप भोयर यांच्या हाती

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केले होते. त्यांच्यासोबत राज्य संघटन सचिव रज्जाक पठाण, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, युवा नेता सूर्यवीर चिकटे, प्रमोद थेरे, प्रदीप खोब्रागडे, रामदास पखाले, मंगला मडचापे, वसंत नावडे, गुरु गजलवार, कुणाल मिलमिले, पंकज आवारी, स्वप्निल मडावी, यांसह अनेक पुरुष व महिला कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलनातील ठोस मागण्या

पूर्ण मार्ग नव्याने उच्च दर्जात तयार करण्यात यावा. निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी. दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे.

“रस्त्याची दुरुस्ती नाही, तर आंदोलन आणखी भडकणार”

नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला की, या मार्गावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचे व वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. तातडीने दुरुस्ती सुरू न केल्यास पुढचे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात उभे राहील.

चर्चेनंतर आंदोलन शांततेत संपन्न

दोन तास चाललेल्या या जोडा मारा आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्या ग्राह्य धरण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन मागे घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post