माधव सरपटवार यांना जैताई मातृगौरव पुरस्कार घोषित.

.           वणी नगरीची ग्रामदेवता असणाऱ्या आई जैताई मंदिरातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वत्र प्रसिद्ध उपक्रमांपैकी एक म्हणजे जैताई मातृगौरव पुरस्कार. यावर्षी हा पुरस्कार वणी येथील सुप्रसिद्ध समाजसेवक माधव गंगाधर उपाध्य बाळासाहेब सरपटवार यांना घोषित करण्यात आलेला आहे. 
           आदर्श विद्यालय वणी येथून मुख्याध्यापक स्वरूपात सेवानिवृत्त झालेल्या, श्री जैताई देवस्थानच्या कार्यात आरंभी सचिव आणि नंतर अध्यक्ष म्हणून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण योगदान देणाऱ्या श्री सरपटवार यांनाच हा पुरस्कार द्यावा असे समितीने एकमताने निश्चित केले हे विशेष उल्लेखनीय. 
          या पुरस्काराचे हे सोळावे वर्ष असून दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी जैताई देवस्थानच्या पटांगणात सायंकाळी ठीक ७-३० वाजता आयोजित भव्य सत्कार समारंभात नागपूर येथील वनराई संस्थेचे अध्यक्ष गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली, दैनिक तरुण भारत नागपूरचे संपादक, वणी चे सुपुत्र शैलेश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ हजार रुपये रोख, महावस्त्र श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरूपातील हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 
         या कार्यक्रमात श्री शैलेश पांडे यांचा देखील सत्कार करण्यात येणार असून सुनील इंदुवामन ठाकरे यांनी संपादित केलेल्या श्री माधव सरपटवार यांच्या "माझे जीवन गाणे "या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन होणार आहे. त्यानंतर शैलेश पांडे यावर भाष्य करतील.
          त्यांच्या तब्बल २३ वर्षांच्या सचिव पदाच्या आणि त्यानंतरच्या आजपर्यंतच्या अध्यक्षपदांच्या कार्यकाळात त्यांनी अविरत स्वरूपात, आजच्या वयाच्या ८५ व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल अशा उत्साहात केलेल्या जगदंबेच्या सेवेचा गौरव म्हणून आणि या काळात मंदिरात राबवलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी तथा मंदिराच्या केलेल्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. 
            यानिमित्ताने विविध मान्यवरांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत असून कार्यक्रमास वणीकर जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जैताई देवस्थान समितीचे सचिव ह.भ.प. मनु महाराज तुगनायत आणि समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post