वणी :–
आपल्या समाजाचा सापांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नकारार्थी आहे. पण निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असलेल्या या सापापासून सुद्धा आपल्याला खूप काही शिकता येते. असे प्रतिपादन नगर परिषद शाळा क्रमांक 7 चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले. ते विद्यालयात नागपंचमीच्या दिवशी सापविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्र समन्वयक चंदू परेकर, मंगला पेंदोर व विजय चव्हाण उपस्थित होते.
सापाविषयी माहिती देताना कासावार पुढे म्हणाले की, साप ज्या ठिकाणावरून जातो तेव्हा ते सरळ निघून जातो. कोणालाही हानी पोहचवत नाही. यावरून मनुष्याने आपले जीवन असेच सरळमार्गाने जगावे ही शिकवण मिळते. जेव्हा पर्यंत सापांना आपण छेडत नाही. किंवा त्याला त्रास होत नाही, तेव्हा पर्यंत तो कोणावरही फणा उगारत नाही. किंवा दंश करत नाही. यातून जेव्हापर्यंत कोणी आपल्यावर हल्ला करत नाही किंवा त्रास देत नाही तेव्हापर्यंत कोणावर हल्ला करू नये. हा संदेश मिळतो. साप नियमितपणे आपली कात टाकतो याचा अर्थ आपणही जुने कालबाह्य विचार सोडून नवीन दृष्टिकोन अवलंबून पुन्हा नव्याने ताजेतवाने होऊन जीवन जगण्याची प्रेरणा साप देतो.
साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. निसर्गाचे संतुलन साधण्यासाठी या सृष्टीतील जीवमात्रांची कशी आवश्यकता आहे ते उपस्थित अतिथिनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर ठाकरे यांनी केले. आभार आकांक्षा उईके यांनी मानले.