वणी /
महाराष्ट्र शासनच्या महसूल विभाग आणि नगर विकास विभाग, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने "छत्रपती शिवाजी महाराज, महाराज्यस्व समाधान शिबिराचे" भव्य आयोजन स्थानिक कल्याण मंडपम येथे 30 जुलै 2025 ला पार पडले.
या शिबिरात शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश समोर ठेवण्यात आला.
या शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी. त्यांनी आपल्या भाषणातून नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यावर भर दिला व अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली.
सदर शिबिरामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी वणी, निखिल धुळधर, तहसीलदार वणी, सचिन गाडे, मुख्याधिकारी नगर परिषद वणी, वणी शहराच्या सुप्रसिद्ध डॉ. संचिता नगराळे, स्त्री आरोग्य मार्गदर्शिका यांनी महिला आरोग्य विषयावर विशेष मार्गदर्शन केले. विनोद सुभेदार, व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया वणी शाखा यांनी शासनाच्या विविध बँकिंग योजनावर मार्गदर्शन केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य, यांनी महिलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण आणि उपजीविका या विषयावर मार्गदर्शन केले.
या शिबिरात महिला आरोग्य, उपजीविका, रोजगार, बचत गट, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि शासकीय योजनांचे फायदे, आणि प्रमाणपत्र वितरण अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. डॉ. संचिता नगराळे यांनी विशेषतः महिलांच्या आरोग्यविषयक समस्या आणि उपाय याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
शिबिरात दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद वणीच्या महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग होता. तसेच विविध योजनांमधून निवडक लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आला. याचबरोबर, जन्म मृत्यू प्रमाणपत्र, बँक लिंकेज उपक्रमांतर्गत महिला बचत गटांना धनादेश वितरण, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इत्यादी कार्यक्रमही मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
या शिबिराचे सुत्रसंचालन दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, नगर परिषद वणीच्या विभाग प्रमुख ऍड. पौर्णिमा शिरभाते यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले, तर आभार प्रदर्शन नगर परिषद वणीचे DAY- NULM विभागाचे कर्मचारी विनोद मनवर यांनी केले.
या उपक्रमात एकूण 16 विभागांनी सहभाग नोंदवून शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात मोलाची भूमिका बजावली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागचे कर्मचारी आणि नगर परिषद वणीच्या सर्व अधिकारी, कर्मचारी, विभागप्रमुख आणि कार्यालय अधीक्षक नितेश राठोड यांचे विशेष योगदान लाभले.
हे समाधान शिबिर एक प्रेरणादायी उपक्रम ठरला असून, भविष्यातही असे शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात यावेत, अशी भावना नागरिकांतून व्यक्त केली.