वणी /
महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काढलेल्या ‘सातबारा कोरा यात्रे’ला पाठिंबा जाहीर केला असून जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर हे आपल्या सहकाऱ्यांसह १२ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वसंत नगर दिग्रस येथे बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
तुकाराम माथनकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत, अशी माहिती खुद्द तुकाराम माथनकर यांनी दिली आहे.
देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ‘७/१२ कोरा’ यात्रेला गेल्या ७ जुलै पासून सुरुवात झाली. उंबर्डा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे करत चिलगव्हाण या स्व. साहेबराव करपे यांच्या गावामध्ये या यात्रेची सांगता होणार आहे. पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद या गावी झाली होती हे विशेष..
*शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे - माथनकर*
शेतकऱ्यांची कर्जमाफी, सातबारा कोरा करण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे या लढ्याच्या निमित्ताने का होईना म्हणून आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने बच्चू कडु यांच्या सातबारा कोरा या पायदळ यात्रेला पाठिंबा दिला आहे असे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर, सौ सविता जाधव, सुधीर जवादे पाटील, सौ लीना तूरकर , निलेश पिंपळकर, राजेंद्र इद्दे, ऍड. रुपेश ठाकरे, उमेश राठोड , प्रवीण झाडे, अविनाश लांबट इत्यादी पदाधिकारी 'सातबारा कोरा' या बच्चू कडु यांच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.