वणी /
वणी नगर परिषदेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून दि.५ एप्रिल ला सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राचे शिवाजी उद्यान जवळ थाटात उद्घाटन करण्यात आले.
वणी शहारातील गरीब लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना उपजीविकेची शाश्वत संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील गरीब उत्पादक व ग्राहक यांची सांगड घालणे व शहरी गरिबांना माहिती आणि व्यवसायासाठी आवश्यक ते सहाय्य करणे या उद्देशाने सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून नागरिकांचे बँक खाते उघडणे, सामाजिक विकास योजनांची माहिती देणे, विविध प्रशिक्षण आयोजित करणे, रोजगाराची माहिती देणे, वस्तू व उत्पादन नोंदणी करणे विविध शासकीय योजनांतर्गत संधी बाबत माहिती देणे,या अनुषंगाने विविध सेवा व वस्तू सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे या उद्देशाने सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करण्यात आली.
या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून वणी विधासभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर तर उद्घाटक म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे आणि उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आलेल्या या शहर उपजीविका केंद्राच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी आमदार संजय देरकर यांनी शहरातील गरीब गरजू महिलांना सर्वतोपरी मदत करून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना आणि खाद्य पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून असे दर्जेदार उत्पादन केल्याबद्दल महिलांचे अभिनंदन केले आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांचे मी नक्कीच निराकरण करेल असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थित महिला जन समुदायाला संबोधित करतांना म्हणाले की, महिला ह्या कुटुंबाचा मुख्य धागा आहेत. महिलांची चिकाटी आणि काम करण्याची सचोटी, जिद्द आणि कष्ट करण्याची क्षमता ही फार मोठी असते. आपल्या उद्घाटनीय भाषणात ते बोलत होते. सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राला शुभेच्छा देवून त्यांनी महिलांच्या या संघटनेचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी आपल्या प्रास्ताविकात सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्र स्थापनेच्या कार्यात आलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अडचणींचा उहापोह केला. सर्व प्रकारच्या अडचणी त्यांची कशा दूर केल्या आणि या उपजीविका केंद्राची स्थापना कशी झाली, त्याचे उद्देश काय, भविष्यात केंद्राची वाटचाल कशी राहील इत्यादी विषयांवर यांनी आपले विचार प्रस्ताविकामधून मांडले. क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर यांनी शहर स्तर संघाची वाटचाल आणि सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची स्थापना करतांना आलेली आव्हाने यावर आपले मनोगत व्यक्त केले. सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राची पुढील वाटचाल कशी राहील यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन गाडे यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले की, नगर परिषद अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या मालाची खरेदी करावी. शहरांतर्गत सेवा देणाऱ्या सर्वांनी केंद्रामध्ये नोंदणी करावी जेणे करून नागरिकांना सर्व सेवेचा लाभ मिळेल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही. वस्तू आणि सेवा पुरवठा करण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात नगर पालिकेच्या माध्यमातून याची सुरवात कण्यात येईल असे आश्वासन त्यांनी या प्रसंगी केले.
विभाग प्रमुख अॅड. पौर्णिमा शिरभाते यांच्या अथक परिश्रमातून उभारण्यात आलेल्या या शहर उपजीविका केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्र संचालन उत्तम हापसे, शहर अभियान व्यवस्थापक यांनी केले तर विनोद मनवर, समुदाय संघटक यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी मंचावर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष वणी विधासभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, माजी नगरसेवक प्रमोद निकुरे, विभाग प्रमुख अॅड. पौर्णिमा शिरभाते, क्रांतीज्योती शहर स्तर संघाच्या अध्यक्षा वनिता खंडाळकर, यवतमाळ शहर स्तर संघाच्या अध्यक्षा नीलिमाताई भैसारे, पांढरकवडा शहर स्तर संघाच्या अध्यक्षा दुर्गा अन्नेरवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला यवतमाळ नगर परिषदेचे शहर अभियान व्यवस्थापक अनिल जिरापुरे,समुदाय संघटक लीलाधर दहीकर, पांढरकवडा नगर परिषदेचे सहायक प्रकल्प अधिकारी शिरीष क्षीरसागर, रितेश लाभशेटवार, समुदाय संघटक आणि पांढरकवडा शहरातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली तिवारी, रुणाली मस्के, दुर्गा विरुळरकर, मनजित कौर, प्रिया मेश्राम,रमा नयनवार, वर्षा लाकडे, वंदना काकडे, शामली सहारे,शारदा दोरखंडे,तृप्ती माळीकर, किरण शिरनाथ, रंजना भांडारवार, छाया जांभूळकर, ममता मेंगावार व सर्व वस्ती स्तर संघ आणि शहर स्तर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.