ठाणेदार बदलले, आमदार बदलले, मात्र वणी शहरात अवैध धंदे फोफावले! अवैध धंद्याला आशिर्वाद कुणाचा? सवाल जनतेचा...

वणी /

शहराच्या विविध भागांत मटका, जुगाराचे प्रमाण वाढले आहे. खेळविणारे मालामाल, तर खेळणारे कंगाल होत आहेत. ज्येष्ठांसह युवावर्ग मोठ्या प्रमाणात या मटक्याच्या विळख्यात बुडाला आहे. परिणामी त्यांचे कुटुंब कर्जाच्या खाईत लोटले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
काहींना जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा मटका, जुगार वणी शहरात राजरोसपणे सुरू आहे. 
शहरात मटका, जुगार, दारू विक्री , सुगंधित तंबाखू गुटखा, गांजा असे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. दिवसागणिक या अवैध व्यवसायांची उलाढाल वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी सुरू असलेला हा धंदा आता नवीन ठाणेदार गोपाल उंबरकर आणि नवनिर्वाचित आमदार संजय देरकर निवडून येताच रस्त्यारस्त्यांवर खुलेपणाने चालविला जात आहे. त्यामुळे या धंद्याला आशिर्वाद कुणाचा? अशी शंका जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.

अवैध धंदे बंद करण्याच्या मागण्या मागील काही दिवसांपासून जोर धरत होती. परिणामी अवैध धंद्याला खतपाणी घालत असल्याचे आरोप करत ठाणेदाराच्या बदलीची मागणी करण्यात आली. ठाणेदार अनिल बेहेरानी बदलले मात्र अवैध धंदे सुरू झाले.
 विशेष म्हणजे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून मटका अड्ड्यावर धाड टाकून सुरू असलेला मटका अड्डा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र नवनिर्वाचित आमदार निवडून येताच जणू काही अवैध धंद्याला ऊत आला की काय असे वाटू लागले.
  शहरातील शाम टॉकीज परिसर, निळापुर ब्राह्मणी रोड परिसर अशा अनेक परिसरात मटका घेतला जातो. काही ठिकाणी पडदा टाकून तर काही ठिकाणी खुलेआम मटका सुरू आहे. मटका चालविताना पोलिसांची कोणतीही भीती अथवा कारवाईची धास्ती नसते. विशेष म्हणजे दिवसभर या मटका बुकींवर गर्दी असते.
काही दिवसांपूर्वी चोरून, लपून खेळला जाणारा हा मटका आता मात्र खुलेआम सुरू आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या मटका बुकी चालतात. ओपन, क्लोज अशा दोन्ही वेळेला या भागात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळते. शहरात खुलेआम मटका सुरू असल्याने मटका खेळणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे. आता तर शेतातील पिके काढणीला आले आहे कापूस, तुर , सोयाबीन पिके बाजारात विक्रीसाठी आल्या नंतर शेतकऱ्यांच्या हाती आलेले पैसे जुगारावर लावून काही शेतकरी देशोधडीला लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 
तरुण खिशात पैसा नसेल, तर उधार मटका खेळू लागले आहेत. मटक्यातून झालेली लाखो रुपयांची उधारी फेडण्यासाठी खासगी सावकारांकडून दहा ते वीस टक्के व्याजाने पैसे घेतले जात असल्याची चर्चाही ऐकण्यास मिळाली. यामुळे संपूर्ण कुटुंब सावकारी विळख्यात अडकत आहे. शहर परिसरात ठिकठिकाणी मटक्याचे पेव वाढत आहे. या अवैध व्यवसायावर पोलिस प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष या व्यवसायांना बळ देते का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहर पोलिसांच्या वतीने शहरातील अवैध धंद्यांवर अनेकदा कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी ठोस पावलेही उचलली जातात; मात्र कारवाईत सातत्याची गरज आहे. ठोस कारवाईची आवश्यकता आहे, तरच अशा अवैध व्यवसायांना आळा बसेल असे जनतेतून बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post