वणी :
वसंत जिनिंग सहकारी संस्था एक महत्वपूर्ण सहकारी संस्था म्हणुन नावलौकिक आहे. वसंत जिनिंगमध्ये सध्या राजकारण चांगलेच बिघडले असून आजी माजी अध्यक्षांमध्ये सध्या चांगलाच संघर्ष दिसून येत आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी माजी अध्यक्ष व संचालक ऍड देविदास काळे यांचे संचालक पद रद्द केले. तर काळे यांनी ही कारवाई नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे.
५ डिसेंबर रोजी आशिष खुलसंगे यांनी वसंत जिनिंगच्या हॉल मध्ये पत्रकार परिषद घेत बैठकीला सतत गैरहजर राहण्याचे कारण देत काळे यांचे संचालक पद रद्द केल्याची माहिती दिली. यावेळी वसंत जिनिंग चे संचालक राजेंद्र कोरडे, घनश्याम पावडे उपस्थित होते.
वसंत जिनिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना आशिष खुलसंगे म्हणाले की, अॅड. देविदास काळे हे ६ सभेत गैरहजर राहिले आहे. जर सलग तीन पेक्षा अधिक सभांना गैरहजर राहिल्यास संचालक पद रद्द केले जाऊ शकते. त्यावरून काळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई संदर्भात २ डिसेंबर रोजी अध्यक्ष व व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. संस्थेच्या उपविधीच्या कलम ३९ नुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली अशी माहिती आशिष खुलसंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आकसापोटी केलेली कार्यवाही बेकायदेशीर- ऍड. देविदास काळे
एखाद्या संचालकाचे पद रद्द करण्याचा अधिकार अध्यक्षाला किंवा व्यवस्थापकाला नाही. अध्यक्षांना आधी कारणे दाखवा नोटीस द्यावी लागते. अशी कोणतीही नोटीस मला आलेली नाही. तसेच बैठकीची कोणतीही नोटीस मला देण्यात आलेली नाही. पद रद्द करायचे असल्यास त्याचा प्रस्ताव सहायक निबंधकांकडे पाठवावा लागतो. झालेली कार्यवाही आकसापोटी असून ती बेकायदेशीर असल्याचे अॅड. देविदास काळे यांनी सांगितले.