वणी -
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला या मतदारसंघात चौथ्यांदा उमेदवारी दिली होती. त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत मी आजवर केलेल्या कामाच्या आधारे आणि महाराष्ट्र सैनिकांच्या सहकार्याने ही निवडणूक लढविली. खरतर आजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले काम पाहता या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय निश्चित असल्याची खात्री होती. परंतु मतदारांनी यासर्व कामाला आणि पक्षाला नाकारले आणि मला पराभवाला सामोरे जावे लागले. माझा पराभव झाला यापेक्षा मोठ दुख मतदारांनी एका कामाच्या माणसाला सत्तेपासून दूर ठेवल. जर असे झाले नसते तर येत्या काळात मतदारसंघाचा कायापालट आणि विकासात्मक बाबीने चित्र वेगळे असते. असो, जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णतः मान्य करून या मताचा आदर करतो. मला निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे, माझ्या पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे, महाराष्ट्र सैनिकांचे, इतर राजकीय पक्षातील, सामाजिक संघटनातील प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व पदाधिकारी – कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो असे उदगार मनसे नेते राजु उंबरकर यांनी व्यक्त केले.
ते शुक्रवारी ६ डिसेंबर ला पक्ष कार्यालय शिवमुद्रा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की या निवडणुकीत माझा झालेला पराभव हा मला संपविणारा नाही. कारण आजवरच्या माझ्या इतिहासात अनेकदा मला पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व पराभवानंतर मी कधी खचलो नाही. रणांगण सोडून कधी दूर गेलो नाही. उलट पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो. कारण हा मतदारसंघ माझा परिवार आहे. येथील प्रत्येक जन माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. म्हणून गेली २० वर्ष मी येथील माता – भगिनी, युवक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, सर्वसामान्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढत आलो. त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी येथील व्यवस्थेशी भांडत आलो.
वेळप्रसंगी रस्त्यावर उतरलो, तुरुंगवास सुद्धा भोगला. आणि जनसेवेचा हा यज्ञकुंड अविरत चालू ठेवला. यासर्व गोष्टीचे आपण सर्व साक्षीदार आहात.
म्हणून याही पराभवा नंतर मी आणि माझा महाराष्ट्र सैनिक कुठेही न खचता कुठेही न थांबता पुन्हा जोमाने, ताकदीने जनतेसाठी सज्ज राहील. मी आमदार जरी झालो नाही तरी आमदाराच्या कर्तव्याच्या समोर जावून काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक स्वबळावर लढणार*
येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर होणार आहे आजवर मतदार संघासाठी केलेल्या सर्व कामांचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडत या निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे जाईल. येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीनिशी उभा राहून ह्या निवडणुका लढविणार आणि यश संपादन करणार -
मनसे नेते राजु उंबरकर
विजयी उमेदवार संजय देरकर यांचे अभिनंदन! - राजु उंबरकर
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांचा विजय झाला त्याबद्दल त्यांचे मनसेचे पराभुत उमेदवार राजु उंबरकर यांनी मनपूर्वक अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या हातून वणी विधानसभा मतदारसंघाची विकासाची वाटचाल व्हावी आणि मतदारसंघ राज्यात सर्वच क्षेत्रात अग्रेसर व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला मनसेचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके , महिला सेना जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर , वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष शिवराज पेचे, आजिद शेख, शुभम भोयर, संदिप वाघमारे, संतोष चिटलवार , सुमीत टुंड्रावार , मिथुन धोटे, वैभव पुराणकर, सूरज काकडे, धीरज बगवा यांच्या सह मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.