वणी -
" वैद्यकीय व्यवसायातील व्यक्तीचे जीवन बाहेरून पाहणाऱ्यांना अत्यंत दिमाखदार आणि आकर्षक वाटत असले तरी प्रत्यक्ष शिक्षणापासून प्रत्येक स्तरावर विविध समस्या असून आज तर स्वतःचा जीव वाचवण्याची देखील जोखीम या व्यवसायात येऊन पोहोचली आहे मात्र तरी तीन-चार दशकापूर्वी तपासलेले पेशंट जेव्हा आठवण काढतात तेव्हा तो सगळ्यात मोठा पुरस्कार वाटतो. असा हा वैद्यकीय व्यवसाय म्हणजे खरोखरच बुद्ध्या स्वीकारलेले सतीचे वाण असते." असे विचार वणी येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायी डॉ. अनिल मुंजे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझं गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यान मालिकेतील ३९ वे पुष्प गुंफतांना, " वैद्यकीय जीवनातील अनुभव" या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष तथा नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
सूत्रसंचालक विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ अभिजित अणे यांनी प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय करून दिल्यानंतर आपल्या खुसखुशीत शैलीतील व्याख्यानाने डॉ. मुंजे यांनी श्रोत्यांचे मन जिंकले.
धावत आलेली जळलेली स्त्री, विषारी दारुने एकाच वेळी आलेले शेकडो पेशंट अशा अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवांच्या सह रंगीत गोळी देण्याचा आग्रह करणारे पेशंट, तुम्ही आले तर मुलगा होतो म्हणणारी अंधश्रद्धा, रात्री दोन वाजता झोप येत नाही म्हणून उठवणारे रुग्ण यांच्या काही हलक्या फुलक्या कथा सांगून त्यांनी श्रोत्यांच्या हास्याला वसूल केले.
आपल्या सादरीकरणात वणीत मिळालेल्या प्रेमाचा विशेष उल्लेख करीत आज शासकीय रुग्णालयामध्ये देखील अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत आहेत याबद्दलचा आनंद देखील त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये गजानन कासावार यांनी अपवादात्मक लोकस्वार्थाने या सेवा कार्याचे व्यवसायात रूपांतर करीत असल्याची खंत व्यक्त करीत निसर्गानुरूप जीवनाची अनिवार्यता अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या आरंभी गंधेवार सरांनी इतनी शक्ती हमे देना दाता ! हे गीत सादर केले तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद लोणारे, राम मेंगावर आणि देवेंद्र भाजीपाले यांनी विशेष परिश्रम घेतले.