वणी :
तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत आहे. वणी पोलिसांनी बुधवारी पहाटे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आयव्हा ट्रक ला पकडले. सदर वाहन पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या रेती सम्राटांचे धाबे दणाणले आहेत.
वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत दिपक चौपाटी ते गोकुळ नगर मार्गावर मंगळवारी पहाटे रेती भरलेला आयव्हा ट्रक आढळला. हा ट्रक पोलिसांनी अडवला असता, या रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे नाईट ड्युटीवर असलेले पिएसआय अप्सुंदे यांनी ठाणेदार अनिल बेहेरानी यांना माहिती देऊन त्यानुसार ठाणेदारांनी तपास करण्याचे आदेश दिले.
वणी पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतलेल्या आयव्हा ट्रक क्रमांक एम एच-34 बिजी - 4047 या वाहनात अंदाजे एक ब्रास रेती आढळून आली मात्र चालकांकडे शासनाची स्वामित्वधन (रॉयल्टी) पावती नव्हती. त्यांच्याकडे रॉयल्टी भरल्याची पावती नसल्याने वाहन चालकाच्या विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर वाहन पोलिस ठाण्यात लावण्यात आले आहे.
तालुक्यातील अहेरी बोरगाव, शिंदोला, बेलोरा परिसरातुन रात्रीच्या अंधारात रेती वाहतूक सुरू आहे मात्र महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने पोलिस प्रशासन आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे. बुधवारी पहाटे रेतीची वाहतुक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची मात्र तहसीलदार निखिल धुळधर यांना कोणतीही माहिती नाही ते कसे अनभिज्ञ! हा एक संशोधनाचा विषय आहे.
गेल्या वर्षी घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने अहेरी बोरगाव रेती डेपो वरुन मोफत रेती दिली जात होती. मात्र मोफत रेती च्या आड काळाबाजार रोखण्यासाठी दरम्यान प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आणि अहेरी बोरगाव रेती डेपो वर दोनशे ते अडीचशे ब्रास रेती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे मात्र तेव्हापासून महसुलच्या वतिने सदर रेतीचा हर्रास करण्यात आला नसल्याने सदर रेती डेपो वरुन रेतीची चोरी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय, त्यामुळे महसुल प्रशासनाने सदर रेती डेपो वरील रेतीची चौकशी करून रेतीचा हर्रास करण्यात यावे अशी मागणी होत आहे.