वणी :
स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करु नये म्हणून ७० हजार रूपयांची लाच घेतांना अन्न व नागरी पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संतोष तेजराम उइके(३४)याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी ३:३० च्या दरम्यान वणी येथील तहसील कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा अधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सचिवांनी तक्रार केली होती.
तालुक्यातील सर्व स्वस्त धान्याच्या दुकानाचे रेकॉर्ड व्यवस्थित नसतात जर मी भेट दिली तर गुन्हा दाखल करीन , कोणतीही कारवाई करायची नसेल तर तुम्हाला संघटनेचे सचिव म्हणून सर्व दुकानदारांकडून पैसे जमा करून प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागेल अशी मागणी उइके यांनी केले होती. असे तक्रारीत नमूद आहे.
शहरासह तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांवर कोणतीही कारवाई करू नये म्हणून तक्रारदाराने उइके यांना पैसे देऊ केले. उइके यांनी ही कारवाई टाळण्यासाठी एक लाख रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे देण्याचे मान्य केले. त्याचवेळी तक्रारदाराने बुधवारी (दि.२३) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. अन्न पुरवठा विभागात पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा लावला. बुधवारी दिनांक २४ ऑक्टोंबर ला दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान उइके यांनी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. उइके हे नुकतेच अन्न व नागरी पुरवठा विभागात रुजू झाले होते.
सदरची कार्यवाही मा.श्री. मारुती जगताप, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, श्री. सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, श्री. मंगेश मोहोड, पोलीस उपअधिक्षक, ला.प्र.वि. अमरावती, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. योगेशकुमार दंदे,पोलीस अंमलदार आशिष जांभोळे, प्रमोद रायपुरे, शैलेश कडू, उपेंद्र थोरात, चालक पोहेकों चंद्रकांत जनबंधू, चालक पोहेकों गोवर्धन नाईक यांनी पार पाडली. नागरीकांनी अशाच प्रकारे भ्रष्टाचारासंबंधी तकार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.