वणी :
दि. वसंत को-ऑपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लि., वणी (रजि. क्र. 106), तालुका वणी, जिल्हा यवतमाळची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर रोजी वसंत जिनिंगच्या सभागृहात उत्साहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद नथूजी वासेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार आबड, कार्यकारी संचालक शंकराव वऱ्हाटे, पुरुषोत्तम आवारी, संजय खाडे, अशोक धोबे, रविंद्र धानोरकर, प्रशांत गोहकार, ॲड. देविदास काळे, गजानन खापणे, घनश्याम पावडे, राजेंद्र कोरडे, अशोक नागभीडकर, विनोद गोडे, आशिष खुलसंगे, साधनाताई गोहकार, शारदाताई ठाकरे, प्रकाश मॅकलवार, भूमारेड्डी बाजलावार, व्यवस्थापक शालिक कोसारकर यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व सभासद उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. त्यानंतर सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा व्यवहार अहवाल, जमाखर्च पत्रक, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद आदी कागदपत्रे सभेसमोर सादर करण्यात आली. यावर सभासदांनी चर्चा केली आणि संबंधित विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेत एकूण 13 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सन 2025-26 या आर्थिक वर्षात संस्थेला तोटा झाल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले. हा तोटा प्रामुख्याने संस्थेच्या मालमत्तेवरील घसाऱ्यामुळे झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, संस्थेच्या प्रत्यक्ष वर्किंगमध्ये 49 लाख 30 हजार 46 रुपयांचा नफा झाल्याचेही सभेत सांगण्यात आले.
यावेळी अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी संस्था कर्जमुक्त झाली असून, शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी लवकरच शिंदोला येथे शेतकरी सुविधा केंद्र उभारण्याचा मानस संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त केला. शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे केंद्र उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी रासायनिक खत विक्रीमध्ये वसंत जिनिंगने यवतमाळ जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, नागपूर यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष प्रमोद वासेकर यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या वतीने वणी येथील शेतकरी मंदिर तसेच मारेगाव येथील शेतकरी सुविधा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यांबाबतही सभेत माहिती देण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देतानाच 10 टक्के रक्कम धनादेशाद्वारे परत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.