वणी :
DCS MH अॅपच्या माध्यमातून शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून पिक पेरा नोंदविण्यात आला आहे. तसेच संबंधित तलाठ्यांच्या लॉगीनवरून त्यास मान्यताही देण्यात आली आहे. मात्र, मान्यता मिळूनही अद्याप सातबारा उताऱ्यावर पिकाची ऑनलाइन नोंद झालेली नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पिकाची ऑनलाइन नोंद सातबाऱ्यावर उपलब्ध नसल्यामुळे शेतमालाचे कापूस किसान रजिस्ट्रेशन तसेच विविध शासकीय योजनांसाठी नोंदणी करताना अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार उमरी व शिरगिरी-शिव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार वणी, मंडळ अधिकारी तसेच संबंधित तलाठी यांच्याकडे निवेदन सादर करून DCS MH अॅपवर नोंदविण्यात आलेला पिक पेरा लवकरात लवकर सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन करण्याची मागणी केली आहे. पिकाची नोंद वेळेत ऑनलाइन झाल्यास शासकीय योजना व कापूस विक्रीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.