वणी :
नागपूर कराराची अपेक्षित अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रविवारी (दि. २८ सप्टेंबर) वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात नागपूर कराराची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विदर्भातील विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली.
समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारात विदर्भाच्या प्रशासकीय व आर्थिक विकासासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या होत्या. विदर्भाला विकासाच्या क्षेत्रात योग्य वाटा, प्रशासकीय संस्थांमध्ये प्रतिनिधित्व, मंत्रिमंडळातील सहभाग तसेच नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यासंदर्भात तरतुदी करण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरही नागपूर करारातील तरतुदींची अपेक्षित अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे विदर्भात बेरोजगारी, मागासलेपणा, सिंचनाचा अनुशेष, रस्ते व पायाभूत सुविधांची कमतरता, कुपोषण, प्रदूषण तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंदोलनाची सुरुवात शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी नागपूर कराराची पार्श्वभूमी विशद केली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपूर्वी नागपूर हे मध्यप्रांत व बेरारचे उपराजधानीचे ठिकाण होते. मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात वीज निर्मिती, खनिज संपत्ती, सुपीक जमीन आणि बारमाही नद्या यांसारखी नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात असूनही या प्रदेशातील समस्यांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. नागपूर कराराची प्रभावी अंमलबजावणी करून विदर्भातील प्रश्न सोडवावेत, अन्यथा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रा. बाळासाहेब राजुरकर, नामदेवराव जेनेकर, गजेंद्र भोयर, देवराव पा. धांडे, व्ही. पी. टोंगे, प्रभाकर मोहीतकर, प्रभाकर उईके, काशीनाथ देऊळकर, दशरथ पाटील बोबडे, संजय चिंचोलकर, अनंतराव मोहीतकर, अशोक चौधरी यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.