वणी | प्रतिनिधी :
वणी तालुक्यातील शिरपूर उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या मंदर, चारगाव, वारगाव, शेलू, पुरड, पुनवट तसेच परिसरातील इतर गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करून वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दोन दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनानुसार, शिरपूर उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये २४ तासांपैकी अवघे ३ ते ४ तासच वीजपुरवठा होत आहे. दिवसभर वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे, मोटार पंप, संगणक आदी विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचा अभ्यास, शेतकऱ्यांची शेतीची कामे तसेच व्यावसायिकांचे दैनंदिन व्यवहारही मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून अखंडित व नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महावितरण प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.