विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ थांबवा; मनसे वाहतूक सेनेचा प्रशासनाला इशारा, शालेय वाहनांच्या नियमांची अंमलबजावणी शून्य; इरशाद खान यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

वणी :

वणी शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सुरक्षेच्या सर्व नियमांना बगल देत सुरू असलेली विद्यार्थ्यांची वाहतूक त्यांच्या जीवाशी खेळणारी ठरत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिनांक ४ जुलै २०२५ रोजी वणी वाहतूक नियंत्रण कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महाले यांच्या अध्यक्षतेखाली शाळा वाहन चालक, व्यवस्थापक आणि वाहनधारकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनांचे वैध फिटनेस प्रमाणपत्र, विमा, कर, परवाना, वाहनांवर शाळेचे नाव व "विद्यार्थी वाहतूक" असा स्पष्ट उल्लेख, फर्स्ट-एड बॉक्स, फायर एक्सटिंग्विशर, आपत्कालीन दरवाजा, जीपीएस ट्रॅकिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, चालकांचे चरित्र प्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणी, ओळखपत्र तसेच लहान मुलांसाठी केअरटेकर ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते.
मात्र, या निर्णयांना वर्षभराहून अधिक काळ लोटल्यानंतरही प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी झालेली नसल्याचे इरशाद खान यांनी निदर्शनास आणून दिले आहे. शहरातील अनेक शालेय बसेस, व्हॅन व खासगी वाहने आजही सुरक्षेचे निकष पायदळी तुडवत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक वाहनांमध्ये जीपीएस, फर्स्ट-एड बॉक्स, सीसीटीव्ही, फायर एक्सटिंग्विशर किंवा केअरटेकरची सुविधा नसल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर वणी शहरातील सर्व शालेय बसेस, व्हॅन व खासगी वाहनांची तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवावी, ४ जुलै २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापन व वाहनचालकांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करावी आणि सुरक्षा निकषांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांची शालेय वाहतूक तात्काळ बंद करावी, अशा प्रमुख मागण्या इरशाद खान यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विषय अत्यंत संवेदनशील असून, भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वणी पोलीस प्रशासन आणि संबंधित शाळा व्यवस्थापनावर राहील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post