वणी–मुकुटबन मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा जीव मुठीत!, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला; तातडीने दुरुस्तीची मागणी

वणी :

वणी ते मुकुटबन या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहने धावत असतात. मात्र खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने त्वरित दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post