वणी :
सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या ४६ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी आणि फ्रेंड्स म्युझिकल ग्रुप, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने "एक शाम रफी के नाम" हा मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांना समर्पित सांगीतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार विवेक पांडे आणि विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष जोशी यांनी वणीतील संगीत रसिकांसाठी दर्जेदार सांगीतिक कार्यक्रम सादर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. प्रा. स्वानंद पुंड यांनी मोहम्मद रफी यांच्या स्वरांची जादू आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे सांगत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. नायब तहसीलदार विवेक पांडे यांनी रफी यांच्या गायकीतील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालय हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून समाजात साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक जाणीवा रुजविण्याचेही कार्य करत असल्याचे सांगितले. समाजातील चांगल्या उपक्रमांमध्ये महाविद्यालयाचा सक्रिय सहभाग राहावा, हीच संस्थेची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर सादर झालेल्या संगीत मैफिलीत गणेश वंदनेपासून सुरुवात करत मोहम्मद रफी यांच्या अनेक अजरामर गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. सविता डोरलीकर, विवेक पांडे, डॉ. प्रसाद खानझोडे, दिगंबर ठाकरे, संतोष जोशी, जयप्रकाश सूर्यवंशी, सारिका चांदेकर, अरुण डवरे, शेख रफीक, शफी खान, समशेर हुसैन, डॉ. संचिता नगराळे आणि महेश जोशी यांनी विविध गीते सादर करून रफी यांना स्वरांजली अर्पण केली.
विशेषतः महेश जोशी यांनी स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही आवाजात सादर केलेल्या गीताने उपस्थितांची भरभरून दाद मिळवली आणि कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.