कुणबी समाजासाठी समाजमंदिर व समाजोपयोगी उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी , नगरसेवक अनिकेत बदखल यांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना निवेदन

वणी :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक अनिकेत बदखल यांनी वणी नगर परिषदेकडे कुणबी समाजासाठी समाजमंदिर तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, नगर परिषद वणी यांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषद हद्दीत कुणबी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही समाजाच्या विविध कार्यक्रम, बैठका, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक कार्यांसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्यामुळे समाजबांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नगर परिषद मालकीच्या उपलब्ध जागांपैकी कोणत्याही अन्य प्रयोजनासाठी आरक्षित नसलेली योग्य जागा कुणबी समाजासाठी समाजमंदिर अथवा समाजोपयोगी उपक्रमांसाठी राखीव करून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
समाजमंदिराची सुविधा उपलब्ध झाल्यास समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक उपक्रमांना चालना मिळेल आणि समाजबांधवांना एकत्र येण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होईल, असे नगरसेवक अनिकेत बदखल यांनी निवेदनात म्हटले आहे.
या मागणीचा नगर परिषद प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post