वणी :
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित देणगी अपहार प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी शनिवारी (११ जुलै) वणी शहरात समस्त रामभक्तांच्या वतीने 'रामरक्षा' आंदोलन आणि प्रभू श्रीरामांची महाआरती आयोजित करण्यात आली. जागृती मारोती मंदिर, आंबेडकर चौक ते ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले.
यावेळी आमदार संजय देरकर यांनी प्रभू श्रीरामांची महाआरती करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना आमदार संजय देरकर म्हणाले की, प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण होणारा निधी हा कोट्यवधी हिंदू भाविकांच्या श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे. त्या निधीच्या कथित अपहाराच्या आरोपांमुळे जनभावनांना धक्का बसला असून, या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच श्रीराम मंदिरासाठी श्रद्धेने अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या वीटा व इतर मौल्यवान वस्तूंच्या कथित अपहाराच्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून धर्मरक्षण, पारदर्शकता आणि जनविश्वास कायम ठेवण्यासाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात सहजिल्हाप्रमुख संजय निखाडे, सौ. किरण देरकर, शहरप्रमुख विनोद ढुमणे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, नगरपरिषद गटनेते सुधीर थेरे, पंढरी राजुरकर, सचिन कुचणकर, मंगेश मोहितकर, सत्यवान महाकुलकर, दिवाकर उरकुंडे, सौ. टीमनताई टोंगे, सौ. किर्तीताई देशकर, सौ. सविता आवारी, मोरेश्वर उज्वलकर, अनिकेत बदखल, राजू पाटील, प्रकाश भाऊ कराड, सुरेशराव देशकर, डॉ. जगन जूनघरी, कुंदन टोंगे, महेश सोमलकर, किशोर मोहेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो रामभक्त उपस्थित होते.