वणी :
येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे बँड पथकाच्या गजरात व पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंतच्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला वणी नगर परिषदेच्या अध्यक्षा विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, नगरसेविका वैशालीताई वातीले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर चांदेकर आणि मुख्याध्यापक गजानन कासावार प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवोदित विद्यार्थ्यांचे हार घालून व पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.
यानंतर प्रवेशोत्सव मेळावा-2 चे उद्घाटन विद्याताई आत्राम यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मानसिक, शारीरिक व बौद्धिक क्षमता चाचणी घेऊन त्यांचा स्तर निश्चित करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांनी त्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.