वणी (प्रतिनिधी) :
वणी तालुक्यातील ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत व पांदण रस्ते’ योजनेअंतर्गत सुरू असलेली अनेक रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदाराने अर्धवट सोडून दिल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन शेतीच्या हंगामात आणि पावसाळा तोंडावर असताना रस्ते वापरण्यायोग्य राहिले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या दोन दिवसांत रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा आणि शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक सुलभ व्हावी, यासाठी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत व पांदण रस्ते योजना’ राबविण्यात येत आहे. मात्र, कंत्राटदाराच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. शेलू ते निवली, पुरड ते नवेगाव, पुरड ते खांदला, पुरड ते निवली यांसह अनेक गावांतील पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
सध्या मशागतीची कामे आणि पेरणीचा हंगाम सुरू झाला असून, रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात ट्रॅक्टर किंवा बैलजोडी घेऊन जाणेही कठीण झाले आहे. काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने हे रस्ते चिखलमय झाल्यास पुढील चार महिने कामे करणे अशक्य होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
मनसेच्या निवेदनात शेलू (बु.) ते निवली या पांदण रस्त्याच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. ३० फूट रुंदीच्या रस्त्याचे काम मंजूर असताना काही ठिकाणी केवळ २० फूट रुंदीचा रस्ता तयार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने रस्त्याची रुंदी कमी केली जात नाही ना, असा संशयही मनसेने व्यक्त केला आहे.
शेतकरी वेठीस; प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा
याबाबत बोलताना मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार म्हणाले की, “कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी राजा वेठीस धरला गेला आहे. प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित कंत्राटदाराला दोन दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी तहसील व पंचायत समिती प्रशासनाची राहील.”
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) तसेच गटविकास अधिकारी (बीडीओ), पंचायत समिती वणी यांनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
निवेदन सादर करताना मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, प्रवीण कळसकर, गजानन मोहितकर, वामन पाचभाई, अनिल ताजने, उमेश आसुटकर, राहुल खामनकार, राजू आसुटकर, अमोल पिदुरकर, भगवान मालेकर, आकाश पाचभाई, गणेश मालेकर, उमेश नक्षीने, ईश्वर मालेकर, कुंडलिक मालेकर यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.