स्टिंग ऑपरेशन न्यूज/
मंगरुळपीर नगर परिषदेच्या कामकाजाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब समोर आली आहे. माहितीच्या अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत एका नागरिकाने नगर परिषदेकडे विविध माहितीची मागणी केली होती. मात्र नियमानुसार निर्धारित मुदतीत माहिती उपलब्ध करून देण्यात न आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाअंतर्गत कचरा संकलन व घनकचरा व्यवस्थापनासाठी देण्यात आलेल्या टेंडरसंदर्भातील माहिती संबंधित नागरिकाने मागविली होती. परंतु ही माहिती देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, नगर परिषदेचे कामकाज पूर्णपणे पारदर्शक असेल तर मागितलेली माहिती वेळेत देण्यात कोणतीही अडचण नसावी. मात्र माहिती मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे शंका आणि संभ्रम निर्माण होत असून नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
माहितीचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाला शासकीय कार्यालयांकडून माहिती मिळविण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी पुढे येत आहे.
दरम्यान, माहिती न मिळाल्याने संबंधित नागरिकाने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मंगरुळपीर नगर परिषद प्रशासन कोणती भूमिका घेते आणि नागरिकांना अपेक्षित माहिती केव्हा मिळते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.