वणी :
शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनासमोर विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून ठोस उपाययोजनांची मागणी केली. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि व्यवहारात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे निवेदन यावेळी करण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने बाजार समिती परिसरातील खासगी मार्केटमधील वजनकाट्यांची तात्काळ तपासणी करून वजनातील गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांवर आर्थिक भार टाकणारी अडत प्रथा बंद करावी आणि शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया नियमितपणे सुरू करावी, अशी भूमिका मांडण्यात आली.
काही व्यापारी व दलालांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. शेतकऱ्यांना योग्य वजन, पारदर्शक व्यवहार आणि त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी बाजार समिती प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे नमूद करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शेतकरी हितासाठी शिवसेना सातत्याने लढा देत राहील, अशी ग्वाहीही पदाधिकाऱ्यांनी दिली.