वणी :
येथील महसूल भवनात गुरुवारी (दि. 4 जून 2026) सकाळी 11 वाजता भारताच्या 2027 च्या जनगणनेच्या अनुषंगाने पर्यवेक्षकांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीस जनगणना चार्ज अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले प्रमुख उपस्थित होते.
यावेळी वणी तालुक्यात सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी हिंगोले यांनी घरयादी व घरगणना संदर्भात प्रगणकांकडून झालेल्या त्रुटींबाबत मार्गदर्शन करत पर्यवेक्षकांनी प्रगणकांशी नियमित संवाद साधून आवश्यक दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे निर्देश दिले.
तसेच वाढलेल्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करणे, शौचालय उपलब्धता, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत यासंबंधीच्या नोंदी अचूक करणे आणि उपलब्ध दुरुस्तीच्या संधीचा लाभ घेऊन माहिती अद्ययावत करण्यावर त्यांनी भर दिला. गुगल मॅपवरील नकाशा आणि प्रगणकांनी तयार केलेल्या नकाशातील इमारतींची संख्या शक्यतो एकसमान असावी, यासाठी प्रत्येक पर्यवेक्षकाने संबंधित प्रगणकांसह प्रत्यक्ष पाहणी करून त्रुटी दूर कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर महसूल सहाय्यक अधिकारी योगेश कोणापुरे यांनी ज्या प्रगणकांनी अद्याप “Mark as Complete” प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती 5 जूनपर्यंत पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश दिले.
या आढावा बैठकीस महसूल सहाय्यक अधिकारी योगेश कोणापुरे, तंत्रस्नेही ऋषी सुरपाम, महादेव शिंदे तसेच महसूल विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.