वणी :
नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच सीबीएसई परीक्षांच्या निकालांमध्ये ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. स्थानिक श्री जैताई देवस्थान सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
यावर्षी विविध परीक्षांमध्ये समाजातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. यामध्ये १३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, ९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर १० विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवत एकूण ३२ विद्यार्थ्यांनी यशाचा मान मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
स्वर्गीय राजाभाऊ पाथरडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. पूजा आनंद कानडे यांच्या तर्फे यशवंत विद्यार्थ्यांना विशेष स्मृतिचिन्हांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रीयन, पाराशर, मारवाडी, मेवाडी तसेच इतर विविध शाखांतील ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. श्री. मुन्नामहाराज तुगनायत होते. प्रमुख वक्ते म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तसेच प्रा. डॉ. अभिजीत अणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मारवाडी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष मुलचंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अध्यक्ष व प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनात मोठे यश मिळवावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. गायत्री खनगन (देशकर) यांनी केले. प्रास्ताविक विवेक देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन अमित उपाध्ये यांनी केले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्रितपणे नियोजन व समन्वय साधला. जेष्ठ समाजनेते अरुणराव कावडकर, चंद्रशेखर खोंड, श्रीकांत उपाध्ये, मिलिंद आमलेकर, श्रीवल्लभ सरमोकदम, आनंद शोभणे, आनंद जोशी, सुरेश देशकर, कीर्ती देशकर, मुलचंद जोशी, मुन्नामहाराज तुगनायत, लक्ष्मीनारायण पांडे, उज्ज्वल पांडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच प्रसाद चिडले, अमित उपाध्ये, अक्षय अणे, आनंद जोशी, आनंद शोभणे, परितोष पानट, वैभव मेहता, श्रवण देशकर आणि निखिल साठे यांच्यासह अनेक समाजबांधवांच्या अथक प्रयत्नांमुळे हा गुणगौरव सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.