वणी :
शहरातील प्रतिष्ठित नागरिक स्व. राजाभाऊ प्राथरडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुत्राने सामाजिक बांधिलकी जपत मोक्षधाम सेवा समितीला शवपेटीसाठी आर्थिक मदत देऊन वडिलांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना दिली आहे.
स्व. राजाभाऊ प्राथरडकर यांचे सन २०२५ मध्ये हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यावेळी मोक्षधाम परिसरात शवपेटीची कमतरता जाणवत असल्याची बाब मोक्षधाम सेवा समितीने त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली होती. ही गरज लक्षात घेऊन राजाभाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे पुत्र ओमकार प्राथरडकर यांनी शवपेटी खरेदीसाठी ८० हजार रुपये मोक्षधाम सेवा समितीच्या खात्यात जमा केले.
या मदतीमुळे मोक्षधाम सेवा समितीला अंत्यसंस्कार व्यवस्थेसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक शवपेटी उपलब्ध होणार असून, त्याचा लाभ शहरातील नागरिकांना होणार आहे. समितीच्या वतीने लवकरच नवीन व आधुनिक सुविधांनी सुसज्ज शवपेटी खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.