श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या वतीने १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा थाटात सत्कार!

वणी :

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वणी यांच्या मुख्य कार्यालयात वर्ष २०२६ मधील इयत्ता १० वी (SSC) व १२ वी (HSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवीदास काळे होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक सुरेश बरडे, लिंगारेड्डी अंडेलवार आणि रमेश भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अध्यक्ष ॲड. देवीदास काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आधुनिक युगातील संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकला. "आज आपल्या भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या शहरांमध्ये यशाचे नवे शिखर गाठत आहेत. मात्र केवळ यशाच्या मागे न धावता चारित्र्य, संस्कार आणि मेहनत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक सुरेश बरडे, लिंगारेड्डी अंडेलवार आणि रमेश भोंगळे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. इयत्ता १२ वीमध्ये वाणिज्य शाखेतील कुमारी अष्टांगी पारेकर (९४.८३ टक्के), कुमारी स्वरा मुळेवार (९४ टक्के) यांच्यासह विज्ञान शाखेतील हिरंकेश शेंडे, प्रज्ञा खैरे व मानसी लीपटे यांचा गौरव करण्यात आला.
तसेच इयत्ता १० वीमध्ये कुमारी आरोही धेंगळे (९८.२० टक्के), अनिकेत तुरणकर (९६.६० टक्के), वैष्णवी भालेराव (९६.२० टक्के), ओजस दहिवालकर, वैष्णवी वाढई, इशिका अवघन, तम्मना बहादे, ऋतुजा पाचभाई आणि तन्वी पाचभाई या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पायल परांडे हिने केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेच्या संपूर्ण कर्मचारीवृंदाने परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम वणी शहरात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post