वणी :
वणी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या वतीने बूथ लेव्हल एजंट (BLA-2) यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेले SIR (Special Intensive Revision) प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. आगामी मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात BLA-2 यांना मतदार पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, नागरिकांशी समन्वय आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षण शिबिरात मुख्य प्रशिक्षक म्हणून डॉ. प्रणित कुमार जांभुळे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे, महिला पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, विविध फ्रंटल संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी, BLA-2 तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना ॲड. सचिन नाईक यांनी भर पावसाळ्यात SIR प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयावर टीका करत, ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करणे आणि पडताळणी प्रक्रियेत सहभागी होणे कठीण ठरणार असल्याचे सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत पुनर्विचार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक प्रौढ नागरिकाने SIR प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक असून, आपला घटनात्मक मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडताना, SIR प्रक्रियेच्या माध्यमातून लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे प्रत्येक मतदाराने जागरूक राहून आपल्या मताधिकाराचे संरक्षण करण्यासाठी SIR प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.